बुधवार, ६ मे, २००९

हेल्मेट


मध्यंतरी हेल्मेटची सक्ती करण्यात आली होती त्यावेळी लिहिलेली ही कविता




'हेल्मेट 'वर कवीवर्य मंगेश पाडगांवकर आणि सौमित्र यांनी जर कविता लिहिली असती तर कदाचित ती अशीच लिहिली असती .


विडंबनाचा एक प्रयत्न

'हेल्मेट' पाडगांवकरांच्या शैलीत


हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं

तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं


मराठीतून त्याला कवच म्हणता येतं

हिंदीतून त्याला शिरस्त्राण म्हणता येतं

हेल्मेट हेच त्याचं दुसरं नेम असतं

हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं

तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं


हेल्मेटच्या सक्तीचा सरकारी कायदा आहे

खरं तर हेल्मेटचा आपल्यालाच फायदा आहे

एकदा डोक्यात घातलं की

हेल्मेट झपाट्याने काम करू लागतं

नको असण्यार्‍यांच्या समोरून कसं

बिनधास्त जाता येतं

घेणेकर्‍यांचा तर त्रासच मिटला

त्यांना उत्तम टाळता येतं

अगदीच मस्त सोय महाराज

सुंदरींकडे टक लावून पाहता येतं

दारू पिऊन पडलात तरी

डोकं फुटणार नसतं

कारण

हेल्मेट म्हणजे हेल्मेट म्हणजे हेल्मेट असतं

तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं

हेल्मेट सौमित्रच्या 'गारवा' शैलीत


तो- दुचाकीस्वार

ती -ट्रॅफिक सिग्नलवर दबा धरून बसलेली शिट्टी

सक्ती जरा जास्तच आहे

दर वर्षीच वाटतं

हेल्मेटचं नांव काढताच

ओझं मनात दाटतं

तरीही चाकं चालत राहतात

मन चालत नाही

हेल्मेटशिवाय रस्त्यांवरती

कुणीच बोलत नाही

कुठून तरी अचानक एक दादा समोर येतो

शिट्टीचा काही भाग ओठांखाली घेतो

दुचाकीस्वार जीव तोडून सैरावैरा धावत राहतो

गल्लीबोळात, चौकाचौकात लपू पाहतो

चक्क सर्वांसमोर दादा माल खिशात टाकतो

पगाराआधीच कुठून हा बोनस त्याच्या हाती येतो ?

दुपार टळून संध्याकाळपर्यंत सुरू असतो हाच खेळ

दादा निघून जाताच चालून येते सुरक्षित वेळ


त्याला हेल्मेट आवडत नाही

तिला हेल्मेट आवडतं

हेल्मेटचं नांव काढताच

डोकं त्याचं भडकतं

दुसर्‍यांना टोप्या घालण्यापेक्षा

हेल्मेट का घालत नाहीस

तिचे असले प्रश्न

त्याला खरंच कळत नाहीत

हेल्मेट म्हणजे गुंतलेले हात

हेल्मेट म्हणजे सांभाळण्याचा त्रास

हेल्मेट म्हणजे वजन अर्धा किलो

हेल्मेट म्हणजे सक्ती उगाच


दरवेळी फिरायला गेल्यावर

दोघांचं हे असं होतं

दंडावरून भांडण होऊन

जगामध्ये हसं होतं

हेल्मेट आवडत नसलं तरी

बाईक त्याला आवडते

हेल्मेटसकट आवडावं म्हणून

तीही झगडते

चिडून मग ती दंड करते

उभं करते पुतळ्यासारखं

त्याचं तिचं भांडण असं

होत राहतं सारखं सारखं

६ टिप्पण्या:

आशा जोगळेकर म्हणाले...

पाडगांवकर स्टाइल जास्त भावली.

अनामित म्हणाले...

nice, good !!!

Unknown म्हणाले...

nice

Mayur म्हणाले...

khupach chhan...baryach diwsani Sanju kaka ase bhetle...Pratyakshat tumchya tondun aiknyat ajun maja ali asti...

pritam म्हणाले...

khup chhan!!!!!!!

Unknown म्हणाले...

पाडगांवकर !zz