कविता marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता marathi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २० डिसेंबर, २००८

मुलगी


ती जन्मली की कपाळावर

अजूनही का पडतात आठ्या ?

टोमणे खात खात हळव्या पोरी

होत जातात मोठ्या


त्याला सगळं मिळतं आधी

तिला नेहमीच नंतर

एकाच रक्ताची ती दोघं

तरी का हे पडतं अंतर ?


दुर्लक्षित ती जगता जगता

झेप घेते आकाशात

काळोखाची छेदून भिंत

वाट शोधते प्रकाशात


तिळ तिळ तुटतो तिचा

थकल्या आई बाबांसाठी

म्हणते मीच होईन बाबा

तुमच्या म्हातारपणची काठी


लेकीच्याच मनात

दाटे मायेचा ओलावा

तिच्या कपाळीचा गंध

देवा आयुष्यभर फुलावा

रविवार, १४ डिसेंबर, २००८

वडील





वडील




आई व वडील हे आपल्या भावविश्वातील,आयुष्यातील श्रद्धास्थान .आईवर खूप कविता आहेत.

मात्र वडीलांवर फारसं लिखाण वाचनात नाही.

माझा एक प्रयत्न..............




वडील


त्यांच्या खांद्यावर बसून


जग दिसतं ते आपल्याला नवं नवंच


आयुष्यभर घरासाठी वडील


होऊन राहतात कवच



सावरण्यासाठीच असतात


त्यांचे मजबूत हात


असतात वडील तोवर


जाणवत नाहीत आघात



ऊन वारा पाऊस झेलत


वडील लकाकी हरवून जातात


उडून जातात पाखरं तेव्हा


वडील एकाकी होऊन जातात



दाटून येतो कंठ गळ्यात


पण अश्रू पापणीतून गळत नाही


आपण वडील झाल्याशिवाय


मोठेपण त्यांचं कळत नाही








शनिवार, १३ डिसेंबर, २००८

एकमेकात गुंतलो की आयुष्य सुरेल गाणे होते



एकमेकात गुंतलो की आयुष्य सुरेल गाणे होते



दरवर्षी व्हॅलेन्टाईन येतो

दर वर्षी तो तयारी करतो

तिच्यासाठी फुले घेऊन

दर वर्षी तो उभा राहतो


व्हॅलेन्टाईनसाठी त्याला

फुलं हवी असतात

ताजी आणि नवी नवी

कारण दरवर्षी

तीही असते नवी नवी


तिच्यासाठीही तो असतो नवा नवा

तरीही तिला तो वाटतो हवा हवा

फुलपाखरासारखं त्याचं मन

असं उंडारत राहतं

नवी फुलं नव्या बागा शोधत राहतं

अजून काही त्याचा शोध संपला नाही

कुणामध्येही त्याचा जीव गुंतला नाही


एक दिवस आजोबा म्हणाले त्याला

अरे आज व्हॅलेंटाईन

जायचं नाही का तुला ?

म्हणाला आजोबांना तो,

आजोबा , रागावणार नसाल

तर एक विचारू तुम्हाला ?

आजोबा होते खुषीत

हसले आपल्या मिशीत

म्हणाले नातवाला,

अरे आज व्हॅलेंटाईन ना ?

मोकळीक आहे तुला

नातूने विचारलं धाडस करून

आजोबा तुम्ही लग्नाआधी

आजींना मेसेज पाठवला होता का कधी ?


झुबकेदार मिशातून आजोबा मोठ्याने हसले

म्हणाले नातवाला

अरे तेव्हा कशाचा आला रे मोबाईल ?

आणी मग आजीला मेसेज कसा रे जाईल ?

अरे बंधनांचा होता तो जमाना

डोळ्यांच्याच नुसत्या खाणाखुणा

नजरेला भिडता नजर

दोघांचही ह्रदय धडकायचं खास

समजायचं संदेश आपल्या प्रेमाचा

तिच्या ह्रदयात झाला पास

गाण्यांच्या भेंड्यात गायचो

तिच्या सौंदर्याचीच गाणी

चोरून बघायची माझ्याकडे

तेव्हां लेका , काळजाचं व्हायचं पाणी


जन्मजात गबाळा मी

रोज करू लागलो दाढी

आवडत नव्हती तिला म्हणुन

सोडून दिली विडी


नातू सुन्न होऊन ऐकत होता

आजी आजोबांच्या प्रेमाची कथा

आजोबा म्हणाले त्याला ,

अरे प्रेम म्हणजे

काटा टोचता एकाच्या पायात

कळ येते दुसर्‍याच्या ह्रदयात

असा जीव गुंतावा लागतो

एकमेकांच्या ह्रदयात

आपुलकीचा सडा कायम शिंपावा लागतो

मग वादळवार्‍यातही प्रेम फुलू लागतं

जगण्याला बळ मिळू लागतं

अशा प्रेमाला नातू महाराज ग्रिटींग्जची गरज नसते

प्रेम असं पोरा शेवटपर्यंत निभावता आलं पाहिजे

मग येणारा प्रत्येक दिवस

प्रेमाचा तराणा होऊन जातो

मग तुला पोरा व्हॅलेटाईनसाठी बहाणा का लागतो ?


नातवाच्या डोळ्यात तेव्हा

आभाळ होते दाटले

आजोबांचे शब्द त्याच्या कानात होते साठले

म्हणाला आजोबांना तो

कुणासाठी तरी निष्ठेने आयुष्य मी वाहीन


मग प्रत्येक दिवस माझा होईल व्हॅलेंटाईन