विनोदी कविता marathi vinodi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विनोदी कविता marathi vinodi kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ मे, २००९

सज्जनांचे पसायदान

सज्जनपणा हाच जीवनातील अडथळा ठरल्याची खंत सज्जनांनी व्यक्त केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात हुकलेले रंगीन क्षण टिपण्याचा हा प्रयत्न

सज्जन माणसे मनाने फारच सोज्वळ असतात

बायकोशेजारी देखील अंतर ठेवून बसतात

बायकोशिवाय त्यांच्या स्वप्नात दुसरी कुणी येत नाही

खरा सज्जन डोळ्यांचा गैरवापर कधी करत नाही

मित्रहो एका रात्रीत कुणी खरा सज्जन होत नाही

झाला चुकून कोणी तर विश्वास लवकर बसत नाही

सज्जनपणा तसा बालपणापासूनच अंगी असावा लागतो

मोह टाळून आयुष्यात नुसताच त्रास सोसावा लागतो

रांग आयुष्यात त्यांनी चुकूनही मोडली नाही

कामे मागच्या दाराची त्यांना कधी जमलीच नाही

कॉलेजमध्ये मैत्रीणींशी त्यांनी कधी केला नाही दंगा

नाही केली भानगड कुणाशी नाही घेतला पंगा

कॉलेजमध्ये राहूनही नाही ठरले ते नशीबवान

संधी न मिळाल्याने गेले राहून चारित्र्यवान

जिवापाड जपले ब्रम्हचर्य मेनकांना नाही दिली संधी

खेटल्या ज्या अंगाशी केली त्यांना हृदयात बंदी

खरा सज्जन जपत असतो कायम देवाचेच नाम

लग्नाआधी जपतो 'जयहनुमान' , लग्नानंतर 'जय श्रीराम'

सज्जन माणसं बायकोशी तशी एकनिष्ठ असतात

बायको माहेरी जाताच इकडे तिकडे बघतात

'फॅशन' चॅनेल कधी कधी सज्जन अगदी जवळून बघतात

लागताच बायकोची चाहूल पटकन 'संस्कार' लावतात

तेवढं सोडलं तर आयुष्यात त्यांच्या पराक्रम दुसरा नसतो

करायला जातात धाडस तेंव्हा प्रयत्न नक्कीच फसतो

सज्जन्नांनी पृथ्वीवरती देवा नुसताच त्रास सोसला

प्रत्येक क्षण आयुष्याचा त्यांचा संयमाने नासला

स्वर्गामध्ये इंद्रदेवा द्या त्यांना भरपूर सवलती

पृथ्वीवरचे तेंव्हा नसावे मुळीच कुणी अवतीभवती

कसर पृथ्वीवरची मनसोक्त सज्जनांना काढू द्या

सोसण्याची त्यांच्या आता तरी कदर होऊ द्या

झिंग जगण्याची त्यांना तिथे तरी चढू दे

होऊनी जरा जास्तच मयसभेत आडवे पडू दे

स्वर्गामध्ये इंद्रदेवा त्यांना असू दे तुझ्याच सवेत

रंभेला चेपू दे पाय अन अप्सरा असू दे कवेत

पृथ्वीवर वाढतील सज्जन जर स्वर्गात कराल कदर

पसायदान देवा माझे सज्जनांसाठी करतो सादर

शनिवार, १३ डिसेंबर, २००८

नेता व्हायचंय एका रात्रीत ?


पूर्वीच्या काळी अनेक वर्षांच्या
समाजसेवेनंतर
नेते तयार होत असत.

आता जमाना बदललाय.

जीवन गतिमान झालंय.

डिजिटल युग आलंय.

आता डिजिटल बॅनरमधून नेते तयार व्हायला लागलेत.

तुम्हाला नेता व्हायची इच्छा असेल तर अलिकडे ते फारच सोपं काम झालं आहे.

तुम्ही फक्त एवढंच करायचं ५०० रुपये खर्चाची तयारी ठेवायची.

अजून मिशाही न फुटलेला परंतु ५०० रुपये खिशात असणारा कोणीही या देशात डिजिटल बॅनर लावून नेता होऊ शकतो.
नेता व्हायची पहिली पायरी : आपल्या दोन मित्रांचे फोटो गोळा करा.तुमचा एक हात उंचावलेला फोटो काढून घ्या आणी स्वत:च्या वाढदिवसाला स्वत:च शुभेच्छा देण्याच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हा.
नेता व्हायच्या या शॉर्टकटवर लिहिलेली माझी एक कवीता


नेता व्हायचंय एका रात्रीत ?

दाखवून टाक झलक

चौकाचौकात लाव पोरा

शुभेच्छांचे फलक

घरादारात गल्लीबोळात

जरी नसेल तुला स्थान (कुत्रंही विचारत नाही)

फलकावरती लिहून टाक

युवकांचे आशास्थान


वडील नेहमीच ओरडत असतात

दाखव काही तरी कर्तृत्व

हरकत काय रे लिहायला

शहराचं खंबीर नेतृत्व ?

वाढेल वलय नेतृत्वाचे

मिळेल तिथे खाता खाता

होऊन जाशील बेट्या एक दिवस

तूच आमचा भाग्यविधाता