विनोदी लेख marathi vinodi lekh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विनोदी लेख marathi vinodi lekh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २ मे, २००९

कवी संमेलन - गल्ली ते दिल्ली



साहित्य संमेलनात ज्यांना कविता सादर करण्याची संधी मिळत नाही. अशा कवींनी आयोजीत केलेल्या साहित्य 

संमेलनास उपस्थीत राहण्याचा योग आला. वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसाय, नोकरी करणार्‍या कवींनी आपल्या 

कवीता या मैफलीत सादर करून एकच धमाल उडवून दिली.

सर्वप्रथम भाजीपाल्याचे ठोक व्यापारी गणपतराव यांनी आपली 'परसबाग' ही रचना सादर केली.



हिरव्या मिरचीचा तोरा

चाफेकळीच्या नाकावर

कसा शोभतो अबोला

टमाट्यांच्या गालावर


भुरूभुरू उडती बटा

डुले जसा तुरा मक्याचा

पाठीवर रुळे शेपटा

जसा वेल पडवळीचा


जसा हिरव्या कोशिंबीरीवर

रंग बीटाचा सांडला

सखे जीव माझा

तसा तुझ्यावर जडला

केवळ तीन कडव्यात गणपतरावांनी सर्व रसिकांना कृषी उत्पन्न बाजार समितीची सफर घडवून आणली. प्रेम आणि भाजी मार्केट ही दोन्ही चित्रे कवितेत एकाचवेळी मांडण्याचा काव्यविश्वातील हा पहिलाच प्रयत्न होता.कवितेतील शब्द किती ताजे आणि रसरशीत होते हे सांगायला नकोच !

त्यानंतर ट्रक ड्रायव्हर बाबू याने ( ट्रक खाली होईपर्यंत)'जीवन एक गाडी' ही कविता सादर केली .





जीवनाच्या गाडीची असते का कधी सोपी वाट ?

पार करावे लागतात वळणावळणाचे घाट

खडबडीत रस्यांवर कधी आयुष्याचं चाक पंक्चर होतं

ओझं असह्य होऊन कधी चाकही फुटतं

नवी जोडी टाकून नवी उमेद घेऊन पुढे चालावं लागतं

गाठण्यासाठी ध्येय रात्रंदिवस चालत राहावं लागतं
वाटेत संकटे उभी राहतात नाक्यानाक्यावर लाल दिवा होऊन

डगमगू नका त्यांचा रुद्रावतार पाहून

'एन्ट्री ' तुमची होताच संकटं निघून जातात

मात्र एक लक्षात असू द्या

आडवाटेने जातांना रस्ताही चुकतो

मोठ्यांशी संघर्षात आपण प्राणासही मुकतो

म्हणून थांबा पहा चला

हाच जीवनाचा मूलमंत्र आहे

डाव्या बाजूने पुढे पुढे मार्गक्रमण करीत रहा

मागच्यांना पुढे जाऊ देऊ नका

पुढे आहेत त्यांच्याही पुढे निघा

अंतीम विजय तुमचाच

बाबूभाईंनी कवितेत स्पेशल गिअर टाकला होता.ममद्या क्लिनर,गालीब फिटर,अण्णा टायरवाला,मारूती वेल्डर यांनी जोरदार टाळ्या वाजवून बाबूभाईंच्या कवितेला दाद दिली.कविता आशयाच्या बाबतीत किती 'गतिमान' असते आणि अभिव्यक्तीची कुठली 'वळणे' घेऊ शकते हे बाबूभाईंनी दाखविल्याने रसिक भारावून गेले होते.

गालीब फिटरलाही त्यामुळे स्फूर्ती आली आणि त्यानेही एक कविता सादर केली


पहिल्या भेटीतच झालीस तू

माझ्या जीवनाची अक्सेंट

सफारीसारखी देशील का

जागा हृदयात प्रशस्त


रुप तुझे देखणे आयकॉन परी

लान्सरच्या वेगाने

येशिल का हृदयाच्या मंदिरी ?

नॅनोसारखे तुझ्यासाठी

सखे लागती नंबर

ओळख प्रेम खरे माझे

जरी तुझ्यामागे प्रेमवेडे शंभर


नको करूस चिंता

गावातल्या रस्त्यांची

तुझी पुरवीन हौस

द्रुतगती महामार्गाची


वाट पाहिन तुझी

गडी आहे मी धीराचा

कधी ओलांडशील उंबरा

सखे माझ्या घराचा


तेवढ्यात बाबूभाईने गालीबला मध्येच टोकले



नव्या नव्या मॉडेल्सचा तुला षौक भारी

कसे यावे लान्सरने कायमचे तुझ्या घरी ?


बाबूभाईंनी कवितेतले वास्तव ठळकपणे रसिकांसमोर मांडल्याने गालीबची पंचाईत झाली .रसिकांनी मात्र टाळ्यांचा कडकडाट करून बाबूभाईंच्या मताशी सहमती दाखवली

आमदार दादासाहेब यांच्या ( लग्नाच्या) पत्नी गुणवंताबाईंनी उपश्तित राहून कविता सादर केली.


जेंव्हा बघावं तेंव्हा

चिकटून बसता खुर्चीला

वाटू लागले मनाला

विसरलात काय बायकोला ?


सदानकदा काढतात दौरे

आतल्या रूममध्ये मिटींगा

चौफुल्यावर मुक्काम करता

बघा आता माझा इंगा


घरच्या मतदारसंघाचा

आधी विकास करा

तालुक्याच्या प्रत्येक गावी

नंतर पाहिजे तेवढं फिरा


गुणवंताबाईंच्या स्पष्टोक्तीमुळे आमदार दादासाहेबांना आपल्या घरच्या मतदारसंघात किती समस्या साचल्या आहेत याचा साक्षात्कार झाला. कवितेमुळे आत्मभान जागे होणे हेच कवितेचं खरं सामर्थ्य असल्याचा प्रत्यय आला.


शेवटी मोहन स्वीट मार्टचे मालक मोहनभाई कराचीवाला यांनी आपली कवितेची जुनी चोपडी उघडली.


सखे तुझे डोळे

जसे जिलेबीचे वेटोळे

तू काजू कतली नाजूक

जसे रवाळ तूप साजूक


जिन्स घालून मागतेस पोरी

बर्गर आणि पिझ्झा

वडापावाची का सखे

येईल त्याला मजा


असे जरी बावळा

तेलकट वेष माझा

शहरातल्या हलवायांचा

मीच आहे राजा


होशील का गडे खरेच

राणी तू माझी

आयुष्यभर स्वयंपाकाची

मिटेल काळजी तुझी


कवितेचा शेवट सखीसाठी आश्वासक होता .सखीवर कवितेचा परिणाम होण्याऐवजी रसिकांची भूक जागी झाल्याने मोहनभाईंच्या दुकानावर रसिकांनी आपला मोर्चा वळवल्याने काव्य मैफल समाप्त झाली .





शुक्रवार, १ मे, २००९

चॅनेल्सची भटकंती


संध्याकाळी घरी आल्यावर टीव्हीवर बातम्या बघण्यासाठी दिन्या सोफ़्यावर बसतो. ' सबसे तेज ' हे त्याचं आवडतं चॅनेल.त्याला स्थानिक बातम्यांमध्ये फारसा रस नाही.दिन्या किमान राज्यपातळी किंवा त्यापुढील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न हाताळतो.तालीबानच्या बंदोबस्तासाठी बराकने कुठली खेळी खेळायला हवी होती हे फक्त दिन्याच सांगू शकतो.गॉर्डनचं कुठे चुकलं हे फक्त दिन्यालाच कळतं.बराक आणि गॉर्डन दिन्याच्या टीकेला जाम टरकून असतात. बराक म्हणजे आपला ओबामांचा दिवटा ! आणि गॉर्डन म्हणजे यु के च्या ब्राऊनचं शेंडेफळ !परवाच बराक विजयी झाला तर जगभरातून त्याचं अभिनंदन होत असतांना बराकने अगोदर दिन्याला फोन केला .म्हणाला दिनकरराव , खरं तर बराक ड्रिंकरराव असंच म्हणाला होता ते जाऊ द्या. बराक म्हणाला होता , दिनकरराव तुम्ही ' यस वुई कॅन ' ही स्लोगन दिली नसतीत तर माझं काही खरं नव्हतं. शरदरावांनी विलासरावांना कसा शह द्यायला हवा होता याची खबरबात आबांशिवाय फक्त दिन्यालाच आहे.अटलांटीक समुद्रापारचे साहेब आणि आपले बारामतीचे साहेबही आपलं ऐकत असतांना घरात बायको आपलं ऐकत नाही हे शल्य त्याला आहे .
आज जेंव्हा तो ऑफीसहून घरी परतला तेंव्हा आपण ऑफीसला गेल्यापासून जगात काय काय उलथापालथ झाली असेल या चिंतेने तो व्याकूळ झाला होता. मात्र चिरंजीवांनी अगोदरच टेन स्पोर्टसचा ताबा घेतलेला असल्याने अजून अर्धा तास तरी आपल्याला संधी मिळणार नाही हे जाणून तो वर्तमानपत्र वाचू लागतो.सकाळीच सगळ्या बातम्या ' येथे छापून येथे प्रसिद्ध केले ' इथपर्यंत वाचून झालेल्या असल्याने तो शब्दकोडे सोडवू लागतो.बायकोने अगोदरच बरंचसं चुकीचं सोडवून ठेवलेलं असल्याने त्याच्या दुरूस्तीत दिन्याचा बराचसा वेळ जातो.मधूनच तो टीव्ही कडे नजर टाकतो. चिरंजीव डबल्यू डबल्यू ई वर रक्तपात बघण्यात दंग झालेले असतात.खली आणि अंडरटेकरची मारामारी सुरू असते.खलीला ठोशांवर ठोशे बसत असतांना चिरंजीव चिंताक्रांत होतात. रेफ्री अंक मोजू लागतो. नवव्या अंकापर्यंत येतो तेंव्हा तिकडे खली उठून उभा राहतो आणि इकडे चिरंजीव ! एकदाचा खली लवकर जिंकावा अशी दिन्या प्रार्थना करतो.प्रादेशिक बातम्यांची वेळ झाल्यावर दिन्या चिरंजीवांना अभ्यासाची आठवण करून देतो. अभ्यास करूनच चिरंजीव टी व्ही बघायला बसल्याचा संदेश किचनमधून आल्याने दिन्याचा नाईलाज होतो. अंबानी बंधूंची मारामारी रंगलेली असतांना खली आणि अंडरटेकरची मारामारी बघणे त्याला असह्य होते.तेवढ्यात जाहिराती सुरू होतात.दिन्या संधी साधून रिमोट हातात घेऊन बातम्या लावतो. चिरंजीवांना पुढील धोका लगेच लक्षात येतो.तो म्हणतो पपा , 'पप्पू पास हो गया' ही जाहिरात राहू द्या ना . ही जाहिरात ऐकताच बायको किचनमधून धावत येते.किती छान आहे ना असं लाडिकपणे दिन्याला म्हणते. बहुमत आपल्या बाजूला नसल्याचं दिन्याच्या लक्षात येतं. तो पुन्हा टेन स्पोर्टस लावतो.एकदाचा खली जिंकतो.खलीने आतापर्यंत शॉन मायकेल ,जॉन सेना, रॅन्डी ऑर्टन ,ट्रिपल एच यांना कसं हरवलेलं आहे हे चिरंजीव उत्साहात सांगत असतात.दिन्या व्वा व्वा , असं ? म्हणून प्रतिसाद देतो.
चिरंजीव मित्रांबरोबर बाहेर खेळायला निघून जातात.बायको किचनमध्ये स्वयंपाक करत असते. हॉलमध्ये आता दिन्याचंच राज्य असतं.बातम्या संपलेल्या असतात. दिन्या भराभर चॅनेल बदलून मन रमेल अशा चॅनेलचा शोध घेत राहतो.फ़ॅशन टीव्हीवर धमाल चाललेली असते. रॅम्पवर सुंदर सुंदर मॉडेल्स शरीराला हेलकावे देत कॅटवॉक करीत येत जात असतात.मदमस्त संगीत सुरू असतं.दिन्या आवाज कमी करतो.मॉडेल्सना जवळून निरखून बघतो. यंदा भारतात कापूस उत्पादकांच्या आत्महत्या का वाढल्यात याचा आता उलगडा त्याला होतो.तेवढ्यात किचनमधून बायकोची हाक येते.दिन्याने रिमोटवर एक बोट अगोदरच ठेवण्याची दूरदृष्टी दाखवलेली असते.तो पटकन 'संस्कार' चॅनेल लावतो.फॅशन टी व्ही, एम टीव्ही यासारखे रिस्की चॅनेल लावतांना सज्जन माणसांना एक बोट रिमोटवर ठेवूनच बसावं लागतं. संस्कार ,आस्था,सुदर्शन हे तसे रिस्क फ़्री चॅनेल्स आहेत.संस्कारवर बापूंचं प्रवचन सुरू असतं. नवरा सत्संगात रमलेला पाहून बायको अगदी धन्य धन्य होऊन जाते.कूकरची शिटी वाजताच ती बॅक टू पॅव्हेलिअन जाते.आता दिन्या एम टी व्ही हे रिस्की चॅनेल लावतो. अल्पवयीन पिढीला लवकर वयात आणण्याचं महत्वपूर्ण काम इथे वेगाने सुरू असतं.त्याच्या मनात विचार येतो , अशा चॅनेल्सच्या पराक्रमामुळेच भारत तरुणांचा देश बनला आहे ! आम्हाला जे कॉलेजला असतांना जमलं नाही त्यात ह्या मुलांनी आठवीच्या वर्गातच प्राविण्य मिळवलं आहे.कॉलेजचा अभ्यास ही मुलं आठवीतच पूर्ण करतात. अलिकडची पिढी फारच हुशार झाली ती काही उगाच नाही .पुन्हा दारावरची बेल वाजते. पुन्हा दूरदृष्टी कामाला येते. आता दिन्या 'नॅशनल जिओग्राफिक ' हे केवळ रिस्क फ्रीच नव्हे तर ज्ञान देणारं चॅनेल सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणतो आणि दार उघडतो.लग्नाचं निमंत्रण द्यायला मित्र आलेला असतो.ख्याली खुशाली विचारली जाते. चहा येईपर्यंत मित्रही मगरीला पकडण्याचा कार्यक्रम पाहण्यात रंगून जातो. ऑस्ट्रेलियाचा एक हाफ पॅंटवाला पूर्वी कायम दिसायचा.दिन्याने त्याचं नांव 'सापधर्‍या' असं ठेवलं होतं. समुद्रात शूटींग करतांना गेला बिचारा .दिन्याला त्याचं जाम कौतुक होतं.साधा गल्लीतला कुत्रादेखील आपल्याकडे डोळे वटारून पाहतो तेंव्हा तीन इंजेक्शन्स एकाचवेळी शरीरात खुपसल्याचा भास होतो.श्वान महोदयांच्या नजरेला नजर देण्याची आपली हिंमत होत नाही. चुकून दिलीच तर कोण कोणाला अगोदर घाबरतो हे बघून पुढचे डावपेच ठरतात.कुत्रा घाबरला तर आपण विजयी मुद्रेने परतायचं असतं. पण कुत्रा ही संधी सहसा आपल्याला देत नाही.म्हणून दिन्याला सापधर्‍याचं जाम कौतुक आहे.चहापाणी झाल्यावर मित्र निघून जातो. दिन्या आता स्पोर्टस चॅनेल लावतो. क्रिकेटचं समालोचन अर्थात भारताच्या पराभवाची समीक्षा सुरू असते.तशी ती अनेक वर्षांपासून सुरू आहे.फक्त नावे ठेवणारी माणसे बदलत असतात.यावेळी ही जबाबदारी नवज्योतसिंग सिद्धू, श्रीकांत आणि रवी शास्त्रीवर सोपवलेली असते. हसत खेळत भारताच्या पराभवाची चर्चा सुरू असते. युवराजने बेजबाबदार फटका मारला नसता तर भारताला विजयाची संधी होती असं श्रीकांत सांगत असतो .दिन्या इ एस पी एन चॅनेल लावतो त्यावर जुनी मॅच दाखवत असतात.त्यात श्रीकांत बेजबाबदार फटका मारून बाद होतो आणि भारत मॅच हरतो.पूर्वी फक्त दूरदर्शन होतं तेंव्हा दिन्या कुठलेही कार्यक्रम बघत असे. आता इतके चॅनेल असून देखील त्याचं मन कशातच रमत नाही. तो भराभर चॅनेल बदलत राहतो.बहुतेक चॅनेलवर साबणांच्या जाहिराती सुरू झालेल्या असतात.सर्वत्र फेसच फेस ! दिन्या ताजातवाना होतो. भंगार कार्यक्रम बघण्यापेक्षा जाहिराती त्याला आवडतात. 'वा सुनिलबाबू नया घर ......वही मिसेस ?'हे वाक्य त्याच्या मनात घर करून बसले आहे.गळ्यात मण्यांच्या मोठ्या माळा घालून ग्रह फिरले तर काय होऊ शकतं हे कोणीतरी धमकावत असतो. आस्थावर गुरूजी अहिंसेचं महत्व सांगत असतांना शेजारच्या अनीमल प्लॅनेटवर सिंह हरणांची शिकार करत असतात.खानाखजानात संजीव कपूर दाल मखनी, पिझ्झा बनवतांना दिसतो.त्यानंतर असिडिटीवर जालीम इलाज इनो ही जाहिरात झळकते. अशा गंमतीजंमतींमध्ये दिन्याचा मस्त वेळ जातो.दिन्याला साडेआठपर्यंतच टीव्ही बघण्याची संधी आहे. एकदा क का कि की सिरियल्स सुरू झाल्या की त्यानंतर अकरा वाजेपर्यंत त्याला चॅनेल बदलण्याची संधी मिळणार नसल्याने तो भराभर चॅनेल्स बदलत राहतो.

शनिवार, ११ एप्रिल, २००९

कुछ तो लोग कहेंगे


जगात वागावं कसं याची सध्या मधूला चिंता सतावतेय . त्याला सर्वांचंच म्हणणं पटतं.त्यामुळेच तो अडचणीत सापडलाय.करोडपती कसे व्हावे ? हे पुस्तक त्याने विकत आणले ते आयुष्यात प्रगती करून साठीच. पण यामुळे फक्त लेखकाचीच प्रगती झाल्याचे त्याला जेंव्हा उमगले तेंव्हा ठेवीले अनंते तैसीची रहावे या उक्तीप्रमाणे त्याने वागायचे ठरवले. तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत.
जगाचं असंच असतं.मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही.श्रीमंत असला की म्हणतात ,दोन नंबर करत असणार ! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं ?प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत.आम्ही चोवीस तास राब राब राबतोय .झालो का श्रीमंत ?तो श्रीमंत झाला. निश्चीत बेईमानी केली असणार त्याने ! त्याशिवाय तो श्रीमंत होऊच शकणार नाही .पैशाच्या मागे दिवसरात्र धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे.पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात , त्याच्या जीवनात महत्वाकांक्षा नाही. नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात.जीवनात चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या म्हणतात.समजा वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही.लगेच त्याला म्हणणार , बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा !स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं कधी आयुष्यात ?आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा ? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं? जास्त भाविक असला तर म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मंदीरात नाही गेला तर नास्तिक म्हणतात.तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात , अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता.दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील '' अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक ?कुठल्या चक्कीचा आटा खातोय कुणास ठाऊक ? ''मनुष्य तब्येतीने बारीक असला तर झुरळ म्हणतात.जाड असला की हत्ती म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं.जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ जाड माणसांमुळेच पडतो.सहज कोणाला मदत केली तर म्हणतात यामागे काहीतरी हेतू असणार ! नाही केली तर म्हणणार साधी माणूसकी नाही.सरळ स्वभावाचा असेल तर म्हणतात अंगात थोडातरी स्वार्थ हवा होता.स्वार्थी असलाच तर म्हणतात सरळ स्वभाव हवा .स्वार्थाचा पैसा काय कामाचा ?खेळकर स्वभाव असला तर म्हणतात आचरट आहे.परिस्थितीचं गांभिर्य नाही.गंभीर असणंही त्यांना रुचत नाही.म्हणतात हसण्याची अलर्जी आहे.तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते.म्हणतात आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला.अयशस्वी झालात तर म्हणणार आमचं ऐकलं नाही .मग भोगा कर्माची फळं .लोकांचं काय घेऊन बसलात ? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची लोकांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं ?जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं ?
मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय.
फिदीफिदी हसतील ते हसू देत की !
बोटं मोडीत बसतील ते बसू देत की !
आपण का शरमून जायचं ?
कशासाठी वरमून जायचं ?
कशासाठी भयाने ग्रासून जायचं ?
फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं ?

रविवार, १४ डिसेंबर, २००८

गाडी बुला रही है



गाडी बुला रही है












भारतीय रेल्वे हा जगातील एक चमत्कार आहे.भारतात जर रेल्वे नसती तर कितीतरी लोकांसमोर समस्या उभ्या राहिल्या असत्या याची कल्पना करवत नाही.जर ही रेल्वे नसती तर रेल्वे स्टेशनशेजारी असणार्‍या गावातील शेगड्या कशाने पेटल्या असत्या ? भिकार्‍यांनी पेटी वाजवत केशवा माधवाची गाणी कुठे म्हटली असती ? खिशात पैसे नसताना दूरच्या नातेवाईकांच्या भेटी कशा घडल्या असत्या ? रेल्वे तशी उदार आहे. येणं फुकट जाणं फुकट पकडले गेलो तर जेवणही फुकट ! असा तिचा उदार कायदा आहे. प्रवासी व मालवाहतूक ही रेल्वेची मुख्य कामगिरी .
या व्यतिरिक्त हिन्दी सिनेमात रेल्वेने खलनायक म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे याचा अभिमानाने उल्लेख करावा लागेल.एखाद्या दुर्घटनेत कुटुंब उध्वस्त झाल्यानंतर अनेक भावांना चरितार्थासाठी मुंबईत आणून सोडण्याचं कार्य मध्यंतरी रेल्वेने निष्ठेने सुरू ठेवलं होतं. मात्र लहान भावांना त्या काळी खूप तहान लागायची. मोठ्या भावाला पाणी आणायला जावं लागायचं.त्या काळी संपूर्ण स्टेशनवर एकच नळ असायचा.शिवाय तेंव्हा मिनरल वॉटरचा जन्म झालेला नसल्यामुळे गाडी सुरू व्हायच्या आत पाणी घेऊन डब्यापर्यंत पोहोचणे मोठ्या भावांना शक्य होत नसल्याने दोन भावांची ताटातूट करण्याचे घोर पातक रेल्वेने केल्याने अनेक कुटुंबातील मोठे भाऊ त्या काळी रेल्वेचा प्रवास टाळत असत.मोठ्या भावांच्या संघटनेनं त्याकाळी या अन्यायाविरोधात आंदोलन केलं होतं हे जुन्या लोकांच्या स्मरणात असेलच आज मुंबईत यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या श्रीमंतांना नशीब अजमावण्याची संधी त्याकाळच्या टी सी च्या मेहेरबानीमुळे मिळाली आहे.

रेल्वेस्टेशनवरील टाईमटेबल समजणारा मनुष्य तर सर्व जगाला परमेश्वरानंतर वंदनीय आहे. अप म्हणजे येणारी की जाणारी हे ज्याला समजले त्याला आपला नेता मानावे व त्याच्या मागे इतरांनी बिनधास्त पळावे.प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एक चौकशी काऊंटर असते.गाडी किती लेट आहे या प्रवाशांच्या एकमेव प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तिथे एका व्यक्तीची नेमणूक केली जाते. निर्वीकारपणे प्रश्नकर्त्याकडे लक्ष न देणारी ती व्यक्ती बघितली की वाटतं या पदावर बहिर्‍या व्यक्तीची नेमणूक करायला हवी.
रेल्वे म्हणजे परोपकारी माणसांचा महासागरच म्हणायला हवी.गाडीत चढतांना किंवा उतरतांना आपल्याला स्वत:ला फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. आपण एकदा त्या गर्दीचा भाग झालो की मागच्या माणसांची जबाबदारी सुरू होते.वर्षानुवर्षे ही माणसे इमाने इतबारे ही कामगिरी पार पाडत असल्याने आपण आपोआप आत शिरू शकतो किंवा बाहेर पडू शकतो.या सामजिक कामासठी ते कुठलाही मोबदला मागत नाहीत.सेवाभावी वृत्तीचे असे मनोहारी दर्शन केवळ रेल्वे प्रवासातच अनुभवायला मिळते.दुसर्‍यांसाठी अगोदरच्या स्टेशनपासून जागा पकडणार्‍या परोपकारी माणसांचे दर्शनही रेल्वेत बघायला मिळते.

रेल्वे ही फक्त प्रवाशांची नसून इडली , वेफर्स विकणार्‍या पॅन्ट्रीकारच्या सेवकांपासून पाववडे,शेंगादाणे ,चिक्की,वेफर्स, केळी, वर्तमानपत्रे फेरीवाल्यांचीही आहे.याबरोबरच भिकारी हा सुद्धा रेल्वेचा अविभाज्य घटक आहे.भिकार्‍यांना टाळून प्रवाशांना रेल्वेतून पळून जाता येत नसल्याने भिकार्‍यांच्या मनात रेल्वेने आदराचे स्थान मिळवले आहे.'केशवा माधवा' या गाण्यावर भिकार्‍यांशिवाय इतर कुणाचाही अधिकार सध्यातरी उरलेला नाही. हे गाणे सूरात गाणार्‍यांना भरपूर कमाई होते.'केशिवा माधिवा 'असा उच्चार कानी पडला की समजावं हे दाक्षिणात्य भिकारी आहेत.महाराष्ट्रात व्यवसाय करतांना या गाण्यापुरती तरी मराठी भाषा त्यांनी शिकून घेतली आहे. त्यामुळे मराठी भिकार्‍यांना जोरदार स्पर्धा तयार झाल्याने याही क्षेत्रातून मराठी माणसाची पिछेहाट होते की काय अशी भीती तयार झाली आहे ! केळी व शेंगा विकणारा येऊन गेल्यानंतर त्यापाठोपाठ केरसुणी घेऊन डबा झाडायला मुका मुलगा हमखास येणारच ! प्रवासी गाडीतच कचरा टाकणार हा आत्मविश्वास त्याच्या पोटाची सोय करून जातो.मुका मुलगा पुढच्या स्टेशनवर गाडीतून उतरल्यावर शेंगावाल्याशी जोराने भांडतांना पाहिल्यावर प्रवासी मुके होतात.

बाकी रेल्वे प्रवासाची सर इतर प्रवासाला येत नाही.सुपरफास्ट गाड्यांपेक्षा पॅसेंजरमधील प्रवासी एकमेकांची लगेच ओळख करून घेतात.जेवणाचा डबा उघडल्यानंतर समोरच्याला आग्रह करणारी माणसे पॅसेंजरमधेच भेटतात.रेल्वे संस्कृतीची ओळख करून देते. केरळचे बॅकवॉटर, सिंधुदुर्गचा स्वच्छ समुद्रकिनारा,निसर्गरम्य कोकण,माथेरानचा गार वारा,खंडाळ्याच्या डोंगरातून कोसळणारे जलप्रपात,सह्याद्रीच्या डोंगरदर्‍या यांचे विलोभनीय दर्शन रेल्वेमुळेच होऊ शकते.भूगोलाच्या पुस्तकांमध्ये ज्या नद्या केवळ रेषा बनून राहतात त्या प्रवाही होऊन वाहतांना सुंदर दिसू लागतात. नद्यांनी दोन्ही तीरांवर उभी केलेली संस्कृती अनेकांचे जीवन समृद्ध करतांना बघून नदी हा केवळ पाण्याचा प्रवाह नसतो याची जाणीव होते.वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद देत, खवैय्यांच्या जिव्हेला तृप्त करत रेल्वे मार्गक्रमण करत राहते.अपवाद फक्त चहाचा !भारतात कुठल्याही रेल्वे स्टेशनवर मिळणार्‍या चहाची चव सारखीच असते. स्टेशनवरचा चहा प्याल्यानंतर भारतात पाणीटंचाई असते यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

नाशिकची द्राक्षे , जळगांवची केळी, लखनऊचे पेरू, रत्नागिरीचा हापूस, नागपूरची संत्री,नांदेडची सिताफळे, काश्मीरची सफरचंदे झाडांवर लगडलेली पाहतांना मन प्रसन्न होते.मराठी गड्याचा कोल्हापुरी फेटा, राजस्थानची पगडी, तमिळी अन्नांची लुंगी,बंगाली बाबू मोशायचे एकटांगी धोतर ही विविधता काही तासांच्या प्रवासाताच अनुभवायला मिळते.म्हणूनच रोजच्या जगण्यात जेंव्हा साचलेपणा निर्माण होतो, मनाला नावीन्याची ओढ लागते तेंव्हा रेल्वेची शिटी साद घालते आणि प्रवासासाठी पावले आपोआप रेल्वेकडे वळू लागतात.