एकमेकात गुंतलो की आयुष्य सुरेल गाणे होते
दरवर्षी व्हॅलेन्टाईन येतो
दर वर्षी तो तयारी करतो
तिच्यासाठी फुले घेऊन
दर वर्षी तो उभा राहतो
व्हॅलेन्टाईनसाठी त्याला
फुलं हवी असतात
ताजी आणि नवी नवी
कारण दरवर्षी
तीही असते नवी नवी
तिच्यासाठीही तो असतो नवा नवा
तरीही तिला तो वाटतो हवा हवा
फुलपाखरासारखं त्याचं मन
असं उंडारत राहतं
नवी फुलं नव्या बागा शोधत राहतं
अजून काही त्याचा शोध संपला नाही
कुणामध्येही त्याचा जीव गुंतला नाही
एक दिवस आजोबा म्हणाले त्याला
अरे आज व्हॅलेंटाईन
जायचं नाही का तुला ?
म्हणाला आजोबांना तो,
आजोबा , रागावणार नसाल
तर एक विचारू तुम्हाला ?
आजोबा होते खुषीत
हसले आपल्या मिशीत
म्हणाले नातवाला,
अरे आज व्हॅलेंटाईन ना ?
मोकळीक आहे तुला
नातूने विचारलं धाडस करून
आजोबा तुम्ही लग्नाआधी
आजींना मेसेज पाठवला होता का कधी ?
झुबकेदार मिशातून आजोबा मोठ्याने हसले
म्हणाले नातवाला
अरे तेव्हा कशाचा आला रे मोबाईल ?
आणी मग आजीला मेसेज कसा रे जाईल ?
अरे बंधनांचा होता तो जमाना
डोळ्यांच्याच नुसत्या खाणाखुणा
नजरेला भिडता नजर
दोघांचही ह्रदय धडकायचं खास
समजायचं संदेश आपल्या प्रेमाचा
तिच्या ह्रदयात झाला पास
गाण्यांच्या भेंड्यात गायचो
तिच्या सौंदर्याचीच गाणी
चोरून बघायची माझ्याकडे
तेव्हां लेका , काळजाचं व्हायचं पाणी
जन्मजात गबाळा मी
रोज करू लागलो दाढी
आवडत नव्हती तिला म्हणुन
सोडून दिली विडी
नातू सुन्न होऊन ऐकत होता
आजी आजोबांच्या प्रेमाची कथा
आजोबा म्हणाले त्याला ,
अरे प्रेम म्हणजे
काटा टोचता एकाच्या पायात
कळ येते दुसर्याच्या ह्रदयात
असा जीव गुंतावा लागतो
एकमेकांच्या ह्रदयात
आपुलकीचा सडा कायम शिंपावा लागतो
मग वादळवार्यातही प्रेम फुलू लागतं
जगण्याला बळ मिळू लागतं
अशा प्रेमाला नातू महाराज ग्रिटींग्जची गरज नसते
प्रेम असं पोरा शेवटपर्यंत निभावता आलं पाहिजे
मग येणारा प्रत्येक दिवस
प्रेमाचा तराणा होऊन जातो
मग तुला पोरा व्हॅलेटाईनसाठी बहाणा का लागतो ?
नातवाच्या डोळ्यात तेव्हा
आभाळ होते दाटले
आजोबांचे शब्द त्याच्या कानात होते साठले
म्हणाला आजोबांना तो
कुणासाठी तरी निष्ठेने आयुष्य मी वाहीन
मग प्रत्येक दिवस माझा होईल व्हॅलेंटाईन
1 टिप्पणी:
mastach ..........
टिप्पणी पोस्ट करा