शनिवार, २० डिसेंबर, २००८

मुलगी


ती जन्मली की कपाळावर

अजूनही का पडतात आठ्या ?

टोमणे खात खात हळव्या पोरी

होत जातात मोठ्या


त्याला सगळं मिळतं आधी

तिला नेहमीच नंतर

एकाच रक्ताची ती दोघं

तरी का हे पडतं अंतर ?


दुर्लक्षित ती जगता जगता

झेप घेते आकाशात

काळोखाची छेदून भिंत

वाट शोधते प्रकाशात


तिळ तिळ तुटतो तिचा

थकल्या आई बाबांसाठी

म्हणते मीच होईन बाबा

तुमच्या म्हातारपणची काठी


लेकीच्याच मनात

दाटे मायेचा ओलावा

तिच्या कपाळीचा गंध

देवा आयुष्यभर फुलावा

२ टिप्पण्या:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

कविता खूप छान आहे. आपल्या देशात मुलगी जन्माला येणं हे अजूनही कमनशीबीपणाचं लक्षण मानलं जातं, हेच या देशाचं कमनशीबीपण आहे.

संजीव देशमुख म्हणाले...

धन्यवाद आदिती