गाडी बुला रही है
रेल्वेस्टेशनवरील टाईमटेबल समजणारा मनुष्य तर सर्व जगाला परमेश्वरानंतर वंदनीय आहे. अप म्हणजे येणारी की जाणारी हे ज्याला समजले त्याला आपला नेता मानावे व त्याच्या मागे इतरांनी बिनधास्त पळावे.प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एक चौकशी काऊंटर असते.गाडी किती लेट आहे या प्रवाशांच्या एकमेव प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तिथे एका व्यक्तीची नेमणूक केली जाते. निर्वीकारपणे प्रश्नकर्त्याकडे लक्ष न देणारी ती व्यक्ती बघितली की वाटतं या पदावर बहिर्या व्यक्तीची नेमणूक करायला हवी.
रेल्वे ही फक्त प्रवाशांची नसून इडली , वेफर्स विकणार्या पॅन्ट्रीकारच्या सेवकांपासून पाववडे,शेंगादाणे ,चिक्की,वेफर्स, केळी, वर्तमानपत्रे फेरीवाल्यांचीही आहे.याबरोबरच भिकारी हा सुद्धा रेल्वेचा अविभाज्य घटक आहे.भिकार्यांना टाळून प्रवाशांना रेल्वेतून पळून जाता येत नसल्याने भिकार्यांच्या मनात रेल्वेने आदराचे स्थान मिळवले आहे.'केशवा माधवा' या गाण्यावर भिकार्यांशिवाय इतर कुणाचाही अधिकार सध्यातरी उरलेला नाही. हे गाणे सूरात गाणार्यांना भरपूर कमाई होते.'केशिवा माधिवा 'असा उच्चार कानी पडला की समजावं हे दाक्षिणात्य भिकारी आहेत.महाराष्ट्रात व्यवसाय करतांना या गाण्यापुरती तरी मराठी भाषा त्यांनी शिकून घेतली आहे. त्यामुळे मराठी भिकार्यांना जोरदार स्पर्धा तयार झाल्याने याही क्षेत्रातून मराठी माणसाची पिछेहाट होते की काय अशी भीती तयार झाली आहे ! केळी व शेंगा विकणारा येऊन गेल्यानंतर त्यापाठोपाठ केरसुणी घेऊन डबा झाडायला मुका मुलगा हमखास येणारच ! प्रवासी गाडीतच कचरा टाकणार हा आत्मविश्वास त्याच्या पोटाची सोय करून जातो.मुका मुलगा पुढच्या स्टेशनवर गाडीतून उतरल्यावर शेंगावाल्याशी जोराने भांडतांना पाहिल्यावर प्रवासी मुके होतात.
बाकी रेल्वे प्रवासाची सर इतर प्रवासाला येत नाही.सुपरफास्ट गाड्यांपेक्षा पॅसेंजरमधील प्रवासी एकमेकांची लगेच ओळख करून घेतात.जेवणाचा डबा उघडल्यानंतर समोरच्याला आग्रह करणारी माणसे पॅसेंजरमधेच भेटतात.रेल्वे संस्कृतीची ओळख करून देते. केरळचे बॅकवॉटर, सिंधुदुर्गचा स्वच्छ समुद्रकिनारा,निसर्गरम्य कोकण,माथेरानचा गार वारा,खंडाळ्याच्या डोंगरातून कोसळणारे जलप्रपात,सह्याद्रीच्या डोंगरदर्या यांचे विलोभनीय दर्शन रेल्वेमुळेच होऊ शकते.भूगोलाच्या पुस्तकांमध्ये ज्या नद्या केवळ रेषा बनून राहतात त्या प्रवाही होऊन वाहतांना सुंदर दिसू लागतात. नद्यांनी दोन्ही तीरांवर उभी केलेली संस्कृती अनेकांचे जीवन समृद्ध करतांना बघून नदी हा केवळ पाण्याचा प्रवाह नसतो याची जाणीव होते.वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद देत, खवैय्यांच्या जिव्हेला तृप्त करत रेल्वे मार्गक्रमण करत राहते.अपवाद फक्त चहाचा !भारतात कुठल्याही रेल्वे स्टेशनवर मिळणार्या चहाची चव सारखीच असते. स्टेशनवरचा चहा प्याल्यानंतर भारतात पाणीटंचाई असते यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.
नाशिकची द्राक्षे , जळगांवची केळी, लखनऊचे पेरू, रत्नागिरीचा हापूस, नागपूरची संत्री,नांदेडची सिताफळे, काश्मीरची सफरचंदे झाडांवर लगडलेली पाहतांना मन प्रसन्न होते.मराठी गड्याचा कोल्हापुरी फेटा, राजस्थानची पगडी, तमिळी अन्नांची लुंगी,बंगाली बाबू मोशायचे एकटांगी धोतर ही विविधता काही तासांच्या प्रवासाताच अनुभवायला मिळते.म्हणूनच रोजच्या जगण्यात जेंव्हा साचलेपणा निर्माण होतो, मनाला नावीन्याची ओढ लागते तेंव्हा रेल्वेची शिटी साद घालते आणि प्रवासासाठी पावले आपोआप रेल्वेकडे वळू लागतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा